Chandrashekar Gokhale

Charolya

मनोगत म्हणजे माझ्यादृष्टीने एक गुढच आहे... काय सांगू? कसं सांगू? असे प्रश्न मलाच पडत राहतात.. म्हणजे कसं आहे की.. सुतारकाम करणारा सांगू शकतो मी सुतारकाम करतो , गोवंडी सुद्धा ठामपणे सांगू शकतो मी बांधकामाचं कुठलही काम सांगा मी करू शकतो

तसं मी माझ्याबाबत म्हणू शकत नाही, कबीराशी तुलना करत नाही
पण कबीराने शेले विणता विणता दोहे लिहिले पण मी लिखाणा शिवाय काहीच केलं नाही
सुचत गेलं मी लिहित गेलो सुचत गेलं मी लिहित गेलो इतकं सोप्प उत्तर आहे खरं तर, पण ते कोणाला पटत नाही ...आणि मला पटवुन देता येत नाही... म्हणजे बघाना पायाळू माणसाला म्हणे गुप्त धनाचा सुगावा लागतो असं म्हणतात आता त्याला जर आपण विचारलं तुला कसं कळतं इथे गुप्तधन आहे? तो काय सांगेल तसच माझं आहे माझ्याकडे सुद्धा गुप्तधनाचा साठा आहे पण त्यावर माझा मालकी हक्क नाही, मला सगळ्यात आधी त्या धनाचा सुगावा लागतो आणि मी वाटून मोकळा होतो

मोकळा होतो म्हणणं सुद्धा तितकसं खरं नाही खरं तर गुरफटत जातो आणि गुरफटण्याचे नवे नवे बहाणे शोधत राहतो आता इथे सुद्धा, www.chnagoonline.com वर मी असाच रमणार आहे तुम्ही जमणार असाल तर कथा कविता आठवणी अनुभव मग काय काय हाताशी लागेल ते आपण वाटून घेऊ... कारण कविता म्हणजे काय याचं एक सगळ्याना पटणारं उत्तर म्हणजे

शब्द अगदी माझ्याशी सख्या मित्रासारखे वागतात अहो कविता म्हणजे काय शब्द दिल्या शब्दाला जागतात...